---Advertisement---
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आता राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेअभावी रखडलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत.
या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र ई-केवायसी पूर्ण न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते रखडले होते. काही ठिकाणी यावरून तक्रारी दाखल झाल्या, तर काही भागात महिलांनी आंदोलनेही केली होती. ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने गंभीर दखल घेत लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने सादर करण्यात आलेल्या अर्जांची छाननीही सुरू करण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार, ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांना फेब्रुवारी महिन्यात एकत्रित 4500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
तर काही लाभार्थींना महापालिका निवडणुकांमुळे जानेवारी महिन्यात केवळ एकच हप्ता देण्यात आला होता. अशा महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा नियमित 1500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.
दरम्यान, भविष्यात या योजनेतील मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसे झाल्यास राज्यातील लाखो महिलांना आणखी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.









