अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा; विमान अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र देत केली मागणी…!

---Advertisement---

 

अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला नवं वळण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणारे पत्र दिले आहे. या पत्रात नेमकं काय नमूद आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी बाह्य यंत्रणेकडून तपास व्हावा, अशी ठाम भूमिका मिटकरी यांनी मांडली आहे.

अमोल मिटकरींच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चा

अमोल मिटकरी यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या शंकांना काही प्रमाणात आधार मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिल्याची माहितीही त्यांनी या पोस्टमधून दिली. तसेच “घातपाती मृत्यूमागील षडयंत्राचा छडा लागेपर्यंत मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय आहे?

अमोल मिटकरी यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर अद्याप सार्वजनिक झालेला नाही. मात्र, अपघाताची चौकशी राज्य यंत्रणेकडून न होता बाह्य आणि तांत्रिक तज्ज्ञांकडून व्हावी, अशी मागणी पत्रात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीही मिटकरी यांनी VSR कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याचा दावा केला होता. या दाव्यामुळेही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. त्यांच्या मते, हा केवळ अपघात नसून सुनियोजित कटाचा भाग असू शकतो. सत्य बाहेर यावे यासाठी विमान भाड्याने देणाऱ्या VSR कंपनीसह संपूर्ण घटनेची चौकशी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ संस्थांकडून विशेषतः फ्रान्स, अमेरिका किंवा यूकेमधील एजन्सीकडून करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान सद्यस्थितीत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) चार सदस्यीय पथकाने अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. 28 जानेवारी रोजी घडलेल्या या दुर्घटनेतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर व्हिडिओ पुरावे तपासले जात असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमोल मिटकरींच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, बाह्य चौकशी जाहीर होते का, आणि रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांना अधिकृत उत्तर मिळते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सत्य काय आहे, याचा उलगडा होणे आता महत्वाचं ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---