---Advertisement---
जळगाव शहरातील प्लास्टिक विक्री थांबवण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. जळगाव महापालिकेने प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर प्लास्टिक विक्री आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात पार पडलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, आरोग्य विभागाचे अधिकारी, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये थेट संवाद साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
महापौरांनी स्पष्ट केले की, व्यापाऱ्यांना सध्या सामंजस्याने सूचना देण्यात येत आहे. मात्र १ मार्चनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तपासणी मोहीम राबवली जाईल. प्लास्टिक साठा किंवा विक्री आढळल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रशासनाचा पहिला टप्पा सिंगल युज प्लास्टिक (कॅरीबॅग) पूर्णपणे बंद करण्यावर केंद्रित असेल. १५ मार्चनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक होणार आहे.
उपमहापौरांनी बैठकीत नमूद केले की, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. शहरात वाढत चाललेला कचरा, नाले तुंबणे, तसेच जनावरांच्या पोटात प्लास्टिक सापडण्याच्या घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने प्लास्टिकऐवजी कंपोस्टेबल बॅग्स आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या खरेदी केल्यास स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असेही नमूद करण्यात आले. पर्यावरणपूरक साहित्य वापराविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
जळगाव शहरात कोणी प्लास्टिक विक्री करत असल्यास नागरिकांनी थेट महापौर किंवा उपमहापौरांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिकमुक्त जळगाव ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
जळगाव शहराच्या दीर्घकालीन हितासाठी आणि भविष्यातील पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. आता व्यापारी आणि नागरिकांचा प्रतिसाद काय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









