---Advertisement---
अकोला शहरात एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर आईच्या ओळखीतील व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असून तीनही मुली आईसोबत नायगाव परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान, आईचे आरोपी सोहेल खान याच्याशी संबंध असल्याची माहिती तक्रारदार वडिलांनी दिली आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी पीडितेच्या बहिणीने वडिलांना फोन करून आरोपीने मारहाण केल्याची माहिती दिली. त्यानंतर वडील तातडीने मुलींकडे पोहोचले असता मोठ्या मुलीने गंभीर आरोप करत सांगितले की, आई घरात नसताना आरोपी रात्री घरी येत असे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे. विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही तिने नमूद केले. हा प्रकार यापूर्वी आईलाही सांगितल्याचा दावा मुलीने केला आहे.
या धक्कादायक खुलाशानंतर वडिलांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत अकोट फाईल पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि समाजातील सजगतेची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून आरोपीवर कडक शिक्षेची मागणी होत आहे.









