---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल व डिझेल विक्रीतून दररोज जमा होणारी रक्कम संबंधित बँक खात्यात भरणे व अचूक हिशोब ठेवणे ही जबाबदारी वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र ७ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्यांनी हिशोबात हेराफेरी करून तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याने १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वडील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची माहिती दिली. तसेच पेट्रोल पंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले.
पोलीस अधीक्षकांनी तत्काळ व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर तपासणीदरम्यान तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये आढळून आले. बँकेत भरणा केल्याच्या पावत्या व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध नव्हते. त्यानंतर लेखापाल एस. आर. पलोड यांनी १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केले असता एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ३ कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपये बँकेत जमा करण्यात आले असून उर्वरित १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, वाल्मीक वाघ हे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपहाराची माहिती उघड झाल्यानंतर आत्महत्येची चिठ्ठी लिहून ते बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.









