पाचोऱ्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; काळ्या फिती लावून निषेध, नागरिकांना फटका

---Advertisement---

 

पाचोरा भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाची झळ आता पाचोऱ्यातही बसली आहे. १८ फेब्रुवारीपासून भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

पाचोरा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत कामकाज केले. मात्र, शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मते, त्यांच्या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघटनांकडून सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्याचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. तसेच महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५० दिवसांच्या कृती आराखड्यात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ठरलेला कालावधी संपूनही निर्णय न झाल्याने नाराजी वाढली आहे.

या संपाचा थेट परिणाम कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर दिसून येत आहे. विशेषतः मोजणीसह विविध तांत्रिक कामे प्रभावित झाली आहेत. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही प्रतीक्षा व अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने तातडीने प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन पुढील टप्प्यात अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---