फी बाकी म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारलं? चोपड्यातील कस्तुरबा विद्यालयातील धक्कादायक प्रकार

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फी बाकी असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय येथे घडल्याची माहिती आहे.

राज्यात आजपासून दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली. संबंधित विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी सज्ज असताना, फी थकबाकी असल्याचे कारण देत तिला हॉल तिकीट देण्यात आले नाही, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. हॉल तिकीट नसल्याने विद्यार्थिनी परीक्षेला बसू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनीचे पालक तातडीने शाळेत पोहोचले. त्यांनी शाळा प्रशासनाशी चर्चा केली तसेच स्थानिक पत्रकारांनाही बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. हा मुद्दा समोर आल्यानंतर परिस्थितीत बदल झाला आणि अखेर विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यात आले. त्यानंतर ती परीक्षेला बसू शकली.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर फी थकबाकीच्या कारणावरून विद्यार्थिनीला परीक्षेत बसण्यापासून रोखणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकांचा आरोप आहे की, केवळ फी बाकी असल्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक भविष्य धोक्यात घालणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या घटनेबाबत शाळा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर हा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून शिक्षण व्यवस्थेतील फी वसुलीच्या पद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या प्रकरणाकडे शिक्षण विभाग आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---