त्रिशुली नदीत प्रवासी बस कोसळली; १८ जणांचा मृत्यू, २६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी…!

---Advertisement---

 

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भीषण रस्ते अपघाताने खळबळ उडाली आहे. राजधानी काठमांडूकडे येणारी प्रवासी बस थेट त्रिशुली नदीत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू झाला असून २६ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

सोमवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ४४ प्रवाशांना घेऊन पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस पृथ्वी महामार्गावरून जात असताना धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ चालकाचा ताबा सुटला. बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या त्रिशुली नदीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही परदेशी पर्यटकांचाही मृतांमध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने आणि बचाव पथकांच्या सहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आले. जखमींना बोटीने सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणून त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी नेपाळ पोलिस, सशस्त्र पोलिस दल आणि लष्कराच्या पथकांनी संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. मात्र, रात्रीची वेळ, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि आवश्यक साहित्याचा अभाव यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले.

सध्या जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे नेपाळमध्ये रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनावर कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---