---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे सध्या एक अनोखी आणि आश्चर्यचकित घडामोड पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरण येथून नाथषष्ठीच्या निमित्ताने पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या काही भागातील नदीपात्र उघडे पडले आहे. आणि याच उघड्या गाळात सोनं सापडत असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी नदीकाठ गजबजून गेला आहे.
गोदावरी नदी पात्रात पाणी ओसरताच नदीकाठावर वेगळीच हालचाल सुरू झाली. चाळण्या, टोपल्या आणि बादल्या घेऊन महिला-पुरुष नदीपात्रात उतरलेले दिसत आहेत. गाळ चाळून त्यातून मौल्यवान धातू, विशेषतः सोन्याचे मणी, अंगठ्या किंवा चांदीचे तुकडे मिळत असल्याच्या चर्चा वेगाने पसरल्या आहेत. या चर्चेचा संबंध पैठणमधील नाथ मंदिर परिसरातील दशक्रिया विधींशी जोडला जात आहे. घाटांवर दररोज धार्मिक विधी पार पडतात. परंपरेनुसार काही कुटुंबे राखेसोबत दागिने किंवा धातूंचे अर्पण करतात. वर्षानुवर्षे हा गाळ पाण्याखाली साचलेला असतो. मात्र सध्या पाणी कमी झाल्याने तो गाळ उघड झाला असून त्यातून मौल्यवान वस्तू सापडत असल्याच्या बातम्यांनी लोकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.

गोदावरी नदीपात्रात सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाळ चाळणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काहींना किरकोळ दागिने मिळाल्याच्या बातम्या तोंडी पसरताच दररोज नव्या लोकांची भर पडत आहे. काहींसाठी हे केवळ कुतूहल आणि अनुभव म्हणून आहे, तर काहीजण अतिरिक्त उत्पन्नाच्या आशेने तासनतास शोध घेताना दिसतात.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पाणी कमी असले तरी नदीतील चिखल खोल आणि घसरणारा असू शकतो. गाळात पाय अडकण्याचा धोका असतो, तसेच अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी काळजीपूर्वक वागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
---Advertisement---
सध्या गोदावरीच्या उघड्या पात्रात सुरू असलेली ही “सोनं शोधण्याची” धडपड पैठणमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. नशीब आजमावण्यासाठी गर्दी वाढत असली तरी संभाव्य धोके लक्षात घेऊनच नदीपात्रात उतरणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.









