---Advertisement---
राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज वातावरण चांगलेच तापले. राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावर चर्चा करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र भाषणादरम्यान त्यांची जीभ घसरल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. ‘काय भीकारचोटपणा सुरू केला आहे’. “एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जात आहेत,” अशी टीका त्यांनी केली. 14 जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण गंभीर असल्याचे सांगत त्यांनी 21 हजार शेतकऱ्यांच्या मृत्यूचा उल्लेख केला. त्यापैकी फक्त 10 हजार कुटुंबांना मदत मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला. भाषणादरम्यान सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह शब्द बाहेर पडला. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
वडेट्टीवार यांनी महापुरुषांच्या विचारांचे पालन होत नसल्याची टीका करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेचाही उल्लेख केला. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त केला.
दरम्यान, विधानसभेतील प्रश्नोत्तरांमध्ये 2009 ते 2025 या कालावधीत एकूण 2783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. 2025 मध्येच 200 प्रकरणांची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या विभागांत सर्वाधिक 1987 आत्महत्यांची प्रकरणे समोर आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण हा गंभीर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बनला असून, यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.









