बुऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्याची ८ लाखांची बॅग लुटणारे ७ आरोपी जेरबंद; रावेर पोलिसांची कारवाई

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याची ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख रुपयांची रोकड आणि दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्माणी हे आपल्या दुकानातील कामगारांसह वसुलीसाठी सावदा, फैजपूर, रावेर परिसरात गेले होते. रात्रीच्या सुमारास परत येत असताना रावेरजवळ अज्ञात आरोपींनी त्यांची कार अडवून ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटून पसार झाले होते. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचा तपास करताना पोलिसांनी रावेर, सावदा व फैजपूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला आरोपींचा माग काढणे कठीण जात होते. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली मिळाली.
या कारवाईत फैज शेख, आताउल्ला खान, शेख सईद, शेख समीर, रोहित खान, रेहमान खान, अकबर खान आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी रेहमान उर्फ हसन फाकड्या हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून ३ लाख रुपयांची रोकड, दोन मोटारसायकली असा एकूण ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयरसवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---