टिपू सुलतानावरून इतिहासाच्या वादाला पुन्हा तोंड फुटलं ? विधानसभेत फडणवीसांचा जोरदार हल्ला…..!

---Advertisement---

 

राज्य विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाच्या मुद्द्यावरून जोरदार भूमिका मांडली. विशेषतः टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. वर्षानुवर्षे शालेय पुस्तकांत टिपू सुलतान यांना महान राजा म्हणून शिकवण्यात आले, पण त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त घटनांचा उल्लेख टाळण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. “टिपू सुलतान चांगले होते की नव्हते हा नंतरचा मुद्दा आहे. मात्र त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे आणि दोघांचे गुणगान समान पातळीवर करणे, याला आमचा ठाम आक्षेप आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढले हे खरे आहे, पण ते स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढले, हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले नाही. तसेच त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि नायर समाजाविरुद्ध अत्याचार झाल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला. “इतिहासाचा संपूर्ण संदर्भ न देता केवळ एकाच बाजूने चित्र मांडण्यात आले,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शालेय अभ्यासक्रमाचा मुद्दाही उपस्थित केला. National Council of Educational Research and Training (एनसीआरटी) च्या जुन्या पुस्तकांत मुघल साम्राज्याला मोठा अवकाश देण्यात आला होता, तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मर्यादित माहिती दिली गेली होती, असा आरोप त्यांनी केला. केंद्रातील सरकारने अभ्यासक्रमात बदल करून मराठ्यांच्या इतिहासाला अधिक स्थान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात राष्ट्रभक्त मुस्लीम समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यांच्याविषयी कोणताही आक्षेप नाही. मात्र जे आक्रमक किंवा देशविरोधी व्यक्तींना ‘हिरो’ मानतात, त्यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

विधानसभेत या वक्तव्यांनंतर इतिहास, अभ्यासक्रम आणि राजकीय भूमिकांवरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा वादाचा विषय ठरला आहे. फडणवीसांच्या भाषणानंतर हा वाद पुन्हा ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---