---Advertisement---
बाजारात सध्या गोड, रसाळ आणि टवटवीत द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. हिरवी असोत किंवा काळी, द्राक्षं दिसली की खरेदीचा मोह आवरत नाही. घरी आल्यावर आपण सर्रास काय करतो? द्राक्षांचा घड थेट नळाखाली धरतो, दोन-तीन वेळा पाणी फिरवतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. पण हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
द्राक्षं फक्त पाण्याने धुणं का पुरेसं नसतं?
द्राक्षांची शेती करताना मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही रसायनं पावसात किंवा पाण्याने लगेच निघून जाऊ नयेत म्हणून त्यात चिकट द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे साध्या पाण्याने धुतल्यावरही त्यांच्या पृष्ठभागावर रासायनिक अंश राहू शकतात.
हे अवशेष शरीरात गेल्यास पोटदुखी, ॲलर्जी, उलट्या, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ असे रसायन शरीरात गेल्यास गंभीर आजारांचाही धोका वाढू शकतो. मग प्रश्न असा आहे कि, द्राक्षं सुरक्षितपणे कशी खायची? तर,
द्राक्ष स्वच्छ करण्याच्या प्रभावी घरगुती पद्धती
1) मिठाच्या पाण्याचा उपाय: एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळा. द्राक्षांचा घड 15 ते 20 मिनिटं त्या पाण्यात भिजत ठेवा. मीठामुळे कीटकनाशकांचा थर सैल होण्यास मदत होते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवा.
2) बेकिंग सोडा पद्धत: एक लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा. द्राक्षं या द्रावणात सुमारे 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने धुवा. ही पद्धत रासायनिक अंश कमी करण्यात प्रभावी मानली जाते.
3) व्हिनेगरचा वापर: तीन भाग पाणी आणि एक भाग पांढरे व्हिनेगर मिसळा. या मिश्रणात द्राक्षं 10 ते 15 मिनिटं भिजवा. यामुळे पृष्ठभागावरील चिकट थर आणि जंतू कमी होण्यास मदत होते. शेवटी साध्या पाण्याने नीट धुवून घ्या.
द्राक्षं धुताना व साठवताना लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी: द्राक्षं देठासकटच धुवावीत. आधी वेगळी केल्यास पाणी आणि रसायन आत शिरू शकतात.
भिजवल्यानंतर किमान 1-2 मिनिटं वाहत्या पाण्याखाली हाताने हलके चोळून धुवा. जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, अन्यथा द्राक्षांची चव बदलू शकते.
द्राक्षं धुतल्यानंतर ती लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका. ओलसर द्राक्षांना लवकर बुरशी लागू शकते. प्रथम ती स्वच्छ कापडावर किंवा टिश्यू पेपरवर पसरवून पूर्णपणे सुकू द्या. सुकल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये साठवा. यामुळे ती जास्त काळ ताजी राहतात.
द्राक्षं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि पचनास मदत करणारे घटक असतात. पण योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास तीच द्राक्षं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून पुढच्या वेळी द्राक्षं विकत घेतल्यावर फक्त पाण्याने धुवू नका. काही मिनिटं अधिक द्या, योग्य पद्धतीने स्वच्छ करा आणि मग निर्धास्तपणे आस्वाद घ्या.









