---Advertisement---
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या वेब सेवेमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून हजारो युजर्सना याचा फटका बसला आहे. विशेषतः आयफोन वापरणाऱ्या युजर्सना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर लॉगिन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब विस्कळीत झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या.
तक्रारींची नोंद करणाऱ्या डाऊनडिटेक्टर या संकेतस्थळानुसार, सकाळी सुमारे ८.३० वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर अडचणींच्या तक्रारी आल्या. त्यापैकी ५६ टक्के युजर्सना व्हॉट्सॲप वेब वापरताना समस्या जाणवत होत्या, तर ३९ टक्के लोकांना मोबाईल ॲपमध्ये अडथळे येत होते. सुमारे ६ टक्के वापरकर्त्यांनी मेसेंजर सेवेत बिघाड असल्याचे सांगितले. भारतातील २५ टक्क्यांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
आयफोन युजर्सना अधिक त्रास:
मिळालेल्या माहितीनुसार, ही समस्या प्रामुख्याने iOS वापरकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक आयफोन युजर्स QR कोड स्कॅन केल्यानंतरही लॅपटॉपशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. काहींना एरर मेसेजही दिसत आहे. मात्र अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सेवा सुरळीत सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. काहींनी “सर्वांसाठी व्हॉट्सॲप बंद आहे का?” असा सवाल केला, तर काहींनी आयफोन लिंक न होण्याबाबत संताप व्यक्त केला.
दरम्यान, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी Meta कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सेवा पूर्णपणे पूर्ववत कधी होणार, याबाबतही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
व्हॉट्सॲप वेबवर लॉगिन होत नसेल तर काय कराल?
जर तुम्हालाही व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करता येत नसेल, तर खालील उपाय करून पाहा:
- ब्राऊझर रिफ्रेश करा किंवा बंद करून पुन्हा सुरू करा.
- स्क्रीनवरील QR कोड पुन्हा स्कॅन करा.
- मोबाईलवरील व्हॉट्सॲप ॲप अपडेट आहे का ते तपासा.
- इंटरनेट कनेक्शन स्थिर आहे का ते पाहा.
- हे उपाय केल्यानंतरही समस्या कायम राहिल्यास काही काळ प्रतीक्षा करणे हाच पर्याय असू शकतो.
सध्या लाखो युजर्स या अडचणीमुळे त्रस्त असून सेवा लवकर सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









