---Advertisement---
जळगाव : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असताना रावेर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भरारी पथकाने जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान तब्बल ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी प्रकरण नसल्याचे नमूद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तपासणीदरम्यान ११ विद्यार्थ्यांविरुद्ध कॉपी प्रकरणी कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित कागदपत्रे केंद्र संचालकांकडे सुपूर्द करण्यात आली होती. नियमानुसार ही माहिती तत्काळ बोर्डाकडे पाठविणे अपेक्षित होते.
मात्र, अवघ्या अडीच तासांत प्रसिद्ध झालेल्या नाशिक बोर्डाच्या सुधारित अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस नसल्याचे ‘निरंक’ दाखविण्यात आले. त्यामुळे पकडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद नेमकी कुठे आणि कशी गायब झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करणवाल यांनी संबंधित केंद्र संचालकांकडून लेखी खुलासा मागविला आहे. माहिती वरिष्ठांकडे का पाठवली गेली नाही आणि अहवालात ‘निरंक’ नोंद कशी झाली, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका होत आहे.









