सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीक विमा भरपाई मंजूर

---Advertisement---

 

रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण ११ कोटी ७ लाख २६ हजार २७८ रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. त्यांनी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.
१६२२ शेतकरी लाभार्थी
सावदा महसूल मंडळातील एकूण १६२२ नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेस पात्र ठरले असून, त्यांना लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा केली जाणार आहे.

आ. एकनाथ खडसे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, हवामान आधारित फळपीक विम्याची रक्कम नियमानुसार १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, १३ डिसेंबर २०२५ पर्यंतही रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

सरकारकडून तांत्रिक कार्यवाही सुरू
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, विमा निधीबाबतची मागणी भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) कडून नोव्हेंबर २०२५ अखेरीस प्राप्त झाली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया सध्या सुरू असून, लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

सावदा, उदळी, तांदलवाडीतील शेतकऱ्यांना दिलासा
सावदा, उदळी आणि तांदलवाडी परिसरातील बाधित केळी उत्पादकांना व्याजासह विमा भरपाई मिळावी, तसेच संबंधित विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आ. खडसे यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलास्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---