---Advertisement---
भुसावळ शहरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री झालेल्या वादातून एका 42 वर्षीय व्यक्तीची सिमेंटच्या कुंडीने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या बाचाबाचीने अचानक उग्र रूप धारण केले. आनंदनगरला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात संशयिताने संतापाच्या भरात सिमेंटची जड कुंडी उचलून अनिल सावकारे यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला.गंभीर जखमी अवस्थेत सावकारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले. घटनेची वार्ता कळताच नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, भुसावळमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे









