---Advertisement---
जळगाव महानगरपालिका तर्फे आज महापालिकेच्या आवारात दोन अत्याधुनिक अग्निशामक बंब तसेच आकाशवाणी चौक येथे तीन जेसीबी यंत्रांचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. शहराच्या आपत्कालीन सेवांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या कार्यक्रमाला जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, गटनेते प्रकाश बालानी तसेच नगरसेवक पियुष कोल्हे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, सिंधू ताई कोल्हे, ईबा पटेल उपस्थित होते. याशिवाय महानगरपालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, उपायुक्त उदय पाटील आणि स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, लोकार्पण सोहळे केवळ प्रशासकीय इमारतीत न करता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी करण्याचा नवा पायंडा यंदा पाडण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना नव्या यंत्रसामग्रीची प्रत्यक्ष माहिती मिळते आणि पारदर्शकतेलाही चालना मिळते.
नवीन अग्निशामक बंबामुळे शहरातील आग प्रतिबंधक सेवांची क्षमता वाढणार असून, जेसीबी यंत्रांमुळे रस्ते दुरुस्ती, नालेसफाई आणि आपत्कालीन कामे जलद गतीने पूर्ण करता येणार आहेत. या उपक्रमामुळे जळगाव शहरातील नागरी सुविधांमध्ये अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









