मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पंढरपूरात तीव्र विरोध; मंदिर परिसरात कडकडीत बंद, मोर्चा काढून निषेध…..!

---Advertisement---

 

पंढरपूर प्रतिनिधी: अभिजीत अवताडे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर योजनेला शहरात तीव्र विरोधाची लाट उसळली आहे. मंदिर परिसरात कडकडीत बंद पाळत स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकरी व विविध संघटनांनी मोर्चा काढून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मंदिर परिसरात बंद, नागरिक रस्त्यावर:

कॉरिडॉर योजनेमुळे ऐतिहासिक मंदिर परिसराचे स्वरूप बदलणार असून स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मंदिर परिसरातील सुमारे ९०० दुकाने, लहान व्यवसाय व घरांवर परिणाम होणार असल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. महिला, ज्येष्ठ नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. “देवस्थानाचे आधुनिकीकरण नको, संवर्धन हवे” अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

विकासाच्या नावाखाली विस्थापन’- स्थानिकांचा आरोप:

कॉरिडॉर योजनेतून विकासाचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात स्थानिकांचे विस्थापन होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
“आमच्या पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या व्यवसायांवर गदा येणार असेल, तर हा विकास कोणासाठी?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. योजनेपूर्वी सविस्तर आराखडा जाहीर करून स्थानिकांशी चर्चा करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

प्रशासनाला निवेदन, प्रकल्प रद्द करण्याची मागणी:

मोर्चानंतर आंदोलकांच्या प्रतिनिधी मंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. कॉरिडॉर योजनेचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, सर्व भागधारकांची बैठक घ्यावी आणि स्थानिकांचे पुनर्वसन व नुकसानभरपाई याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. “लोकांच्या भावनांवर आघात करून विकास मान्य होणार नाही,” असा इशाराही देण्यात आला.

वारकरी व सांस्कृतिक संस्थांचा सहभाग: 

वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्था आणि स्थानिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. पंढरपूरचे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप अबाधित ठेवण्याची भूमिका सर्वांनी मांडली. जर शासनाने लोकभावना लक्षात घेतल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेल्या पंढरपूर कॉरिडॉर योजनेला शहरात तीव्र विरोध होत असून नागरिकांचा आक्रोश उफाळून आला आहे. विकास आणि वारसा संवर्धन यामध्ये संतुलन साधण्याचे मोठे आव्हान शासनासमोर उभे राहिले आहे.

या मोर्चामध्ये कृती समितीचे अभयसिंह इचगावकर, गणेश लंके, व्यंकटेश गलगलकर, वैभव बडवे, यशवंत बेणारे, रजनीश कवठेकर, एडवोकेट गणेश उंडाळे तर नगरसेवक ओंकार जोशी, भागवत बडवे, राहुल शिंदे-नाईक, माजी नगरसेवक किरण घाडगे तर महाराज मंडळींमधून ह. भ. प. माउली महाराज गुरव ह.भ.प माऊली महाराज शिरवळकर आदी मोठ्या संख्येने हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी मोर्चेकरांच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---