---Advertisement---
जळगाव : एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथे सासरच्या लोकांकडून होत असलेल्या पैशांच्या तगाद्याला आणि मानसिक छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव ज्ञानेश्वर बडगुजर (रा. भातखेडे, ता. एरंडोल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा विवाह ११ फेब्रुवारी २०२३ रोजी धुळे येथील संजय भगवान बडगुजर यांची मुलगी दीपाली हिच्याशी झाला होता.
लग्नानंतर काही दिवसांतच सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड (रा. धुळे) हे पैशांची मागणी करत असल्याचा आरोप आहे. पैशांसाठी वारंवार तगादा लावणे, शिवीगाळ करणे व धमक्या देणे, असा प्रकार सुरू होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून गौरव यांनी २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घरात कोणी नसताना टोकाचे पाऊल उचलले.
याबाबत गौरव यांचे वडील तथा भातखेडे येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पुंडलीक बडगुजर यांनी कासोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २ मार्च रोजी सायंकाळी संबंधित तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









