---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामावर असलेल्या ११ परप्रांतीय कामगारांना मेसमधील जेवणातून विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सर्व कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर-थाळनेर-होळनांथे या मार्गावरील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी संबंधित कंपनीने थाळनेर येथे डेपो उभारला असून येथे इतर राज्यांतील अनेक कामगार कार्यरत आहेत.
गुरुवारी रात्री डेपोवरील मेसमध्ये कामगारांनी पोळी, भाजी आणि भात असे जेवण केले होते. जेवणानंतर काही वेळातच काही कामगारांच्या पोटात तीव्र दुखू लागले. त्यानंतर उलट्या सुरू झाल्याने त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.
परिस्थिती गंभीर होताच पहाटे सुमारे चारच्या सुमारास सर्व कामगारांना तातडीने थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये दीपक कुमार, रामभजन यादव, धीरेंद्र यादव, सहदेव बुद्धे, प्रवेश यादव, लाल बच्चन, रोहित कुमार, सम्राटकुमार, रमणकुमार, संदीपकुमार पटेल, विकास गुप्ता आणि विनोद कुमार यांचा समावेश आहे.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने सर्व कामगारांची प्रकृती स्थिर झाली. उपचारानंतर दुपारपर्यंत सर्वांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित कंपनीनेही तातडीने कारवाई केली आहे. कंपनीचे प्रतिनिधी धनंजय महाजन यांनी सांगितले की, घटनेनंतर संबंधित मेस चालकाला कामावरून हटविण्यात आले आहे.
या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.









