१६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १० वर्षे सश्रम कारावास; शहादा न्यायालयाचा निकाल…!

---Advertisement---

 

शहादा: लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. समाधान विक्रम भिल (वय १८, रा. खैरवे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खैरवे शिवारात १८ डिसेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलगी सायंकाळच्या सुमारास शेतात जात असताना, आरोपी समाधान भिल याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन नदीपात्रात नेले व तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणालाही न सांगण्यासाठी त्याने पीडितेसह तिच्या वडिलांना धमकी दिली होती. त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी तिचे शोषण केले. अखेर पीडितेने वडिलांसह सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली होती.

शहादा उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एम. बी. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश ए. राणे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. वाय. बी. मोरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पीडित मुलगी, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरल्या. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी धरून १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनाविली.

या यशस्वी कारवाईबद्दल नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस.,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी तपास अधिकारी व सरकारी अभियोक्ता यांचे अभिनंदन केले आहे. पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते आणि त्यांच्या पथकातील देविदास सूर्यवंशी, अविनाश बिरारे व शैलेंद्र जाधव यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---