---Advertisement---
जळगाव शहरात माणुसकीला आणि नातेसंबंधांना काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. १३ मार्चच्या रात्री उशिरा ते १४ मार्चच्या पहाटे दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या नातेवाईक असलेल्या दोन व्यक्तींनी तिला कॉलनीतील एका घरात बोलावले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने महिलेला गुंगीचे पेय दिल्याचा आरोप आहे.
महिला बेशुद्ध अवस्थेत असताना दोघांनी तिच्या संमतीशिवाय अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने या प्रकाराविरोधात आवाज उठवत पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पीडित महिलेचा वैद्यकीय तपास करण्यात आला असून तिचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.









