---Advertisement---
कोविड काळात सेवा दिलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी
कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ठेका पद्धतीने काम करत रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
साई मॅन पॉवर सर्विसेस या कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर कार्यरत असलेल्या अनेक कंत्राटी कामगारांनी कोविड काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली होती. काहींना स्वतःलाही कोरोनाची लागण झाली होती. अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबीयांपासून दूर राहून त्यांनी कर्तव्य बजावले.
मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वर्ग-३ व वर्ग-४ पदांसाठी कंत्राट स्मार्ट कंपनीला देण्यात आले. या प्रक्रियेत अनुभवी जुन्या कामगारांना डावलून ओळखीच्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे अनेक कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या हक्कांवर गदा आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोविड काळात सेवा बजावलेल्या कक्षसेवक, बेड सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आया, ॲम्बुलन्स चालक, सुरक्षा रक्षक व सफाई कामगार यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक १८ मार्च २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या भेटीत समितीच्या प्रतिनिधींनी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन सादर केले. यावेळी निलेश बोरा, बबन सावळे, निलेश तायडे, रवींद्र कोळी, प्रशांत सोनवणे, विनोद सपकाळे व विलास तायडे उपस्थित होते.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या या कोरोना योद्ध्यांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









