---Advertisement---
शहादा : विमा एजंट असल्याचे भासवून एका ट्रकचालकाला बनावट विमा पॉलिसी देऊन सुमारे ३४ हजार २६० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरद (ता. तळोदा) येथील रहिवासी संदीप जयसिंग राजपूत (वय ३९) हे ट्रकचालक आहेत. त्यांच्या मालकीच्या टाटा मोटार्स कंपनीच्या ट्रकचा (एमएच १८, एम ७६९७) एक वर्षाचा विमा उतरवण्यासाठी त्यांनी शहादा येथील सतीश राजेंद्र चित्रकथे (रा. मुरली मनोहर कॉलनी, मलोनी) याच्याशी संपर्क साधला होता. सतीश चित्रकथे याने आपण चोला मंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे भासवले. त्याने फिर्यादी राजपूत यांच्याकडून ७नोव्हेंबर २०२४ रोजी फोन-पेद्वारे १४ हजार रुपये आणि ८ नोव्हेंबर २०२४
रोजी रोख २० हजार २६० रुपये, असे एकूण ३४ हजार २६० रुपये स्वीकारले. या रकमेच्या बदल्यात त्याने फिर्यादीला विमा पॉलिसीची कागदपत्रे दिली.
काही काळानंतर फिर्यादी राजपूत यांना मिळालेली विमा पॉलिसी बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत संशयित सतीश याला जाब विचारला असता, त्याने पैसे परत न करता फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली व ठार ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप राजपूत यांनी तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित सतीश राजेंद्र चित्रकथे याच्याविरुद्ध कलम २९६, ३३५, ३३६ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश निकम तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात बनावट विमा एजंटपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









