---Advertisement---
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत असतानाच, मोकाट श्वान निर्बीजीकरणाचे काम गेल्या ३ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प पडले असून कुत्र्यांना पकडणारे कर्मचारीच पगार न मिळाल्याने काम सोडून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरात श्वानदंश वाढल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मक्ता मुंबईच्या उत्कर्ष फाउंडेशनला देण्यात आला आहे. १ ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा केला जात असला तरी या कामात अजिबात सातत्य नाही. फेब्रुवारी महिन्यात बिलांच्या थकबाकीमुळे काम बंद पडले होते आणि आता चक्क कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने काम थांबले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने डिसेंबर महिन्यापर्यंतची बिले अदा केली असून इतर दोन महिन्यांचे बीले सुध्दा लवकरच अदा केली जाणार आहे.
सोमवारी मुहूर्त लागणार?
गेल्या तीन दिवसांपासून श्वान पकडणारी व्हॅन जागेवरच उभी आहे. श्वान पकडण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने हे काम रखडले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी पुन्हा काम सुरू होण्याची शक्यता आहे; मात्र वारंवार अशा प्रकारे काम बंद पडत असल्याने मक्तेदारावर महापालिकेचा अंकुश उरला आहे की नाही अशी शंका घेतली जात आहे.









