---Advertisement---
मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल 8 मे रोजी घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
8 मे 2026 पर्यंत तब्बल 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरून नोंदणी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
mahafyjcadmissions.in
प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी आणि मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेतली जाणार आहे. शून्य फेरीअंतर्गत 8 ते 20 मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जाचा भाग-1 सादर करणे, गुणवत्ता यादी, हरकती व दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान, नियमित कॅप फेरी-1 साठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
23 ते 26 मे दरम्यान कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया होणार असून, 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवरून तसेच एसएमएसद्वारे प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती कळवली जाणार आहे.
प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल, तर 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.









