भुसावळमध्ये नाल्यातील कचऱ्याला आग; मरीमाता मंदिर परिसरात खळबळ, नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

---Advertisement---

 

भुसावळ : शहरातील मरीमाता मंदिरालगत असलेल्या नाल्यातील कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून, मध्यवर्ती आणि अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात ही आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेमुळे काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, या घटनेमुळे शहरातील नालेसफाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. याच साचलेल्या कचऱ्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत तातडीने नालेसफाई मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. पावसाळा तोंडावर असताना शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---