---Advertisement---
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून दोषींवर नक्कीच कारवाई होणार, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले.
अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा दावा करत अनेक महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून सरकारनेही तपासाला गती दिली आहे. मुख्य आरोपीला कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, सामाजिक दबावामुळे अनेक पीडित महिला पुढे येण्यास घाबरत आहेत. मात्र, त्यांना धीर देऊन आणि विश्वासात घेऊन पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही महिला समोर येऊ लागल्या असून तपास वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना स्वतः लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले असून विशेष तपास पथक (SIT) देखील कार्यरत करण्यात आले आहे.
या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. काहीजण या संवेदनशील प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत, “ज्यांच्याकडे ठोस पुरावे असतील त्यांनी ते पुढे आणावेत, विनाकारण आरोप करू नयेत,” असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटीच्या माध्यमातून सध्या सखोल तपास सुरू असून, या प्रकरणातील प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.








