---Advertisement---
जळगाव (प्रतिनिधी) : २३ मार्च २०२६ रोजी शहीद दिनानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोना काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
समितीच्या निवेदनानुसार, कोरोना काळात काम केलेल्या अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, शासकीय नोकरी मिळेपर्यंत दरमहा १० हजार रुपयांचे मानधन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
कोविडनंतर काम कमी झाल्यामुळे अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कमी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM-NHM) तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांवर समाविष्ट करावे, असे निवेदनात नमूद आहे. यामध्ये लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), वॉर्ड बॉय, परिचारिका, अँब्युलन्स चालक आदी पदांवर संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, स्मार्ट कंपनीमार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रक्रियेची चौकशी करून ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून दोषींवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे कोविड-१९ काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती केली.
या मोर्चामुळे परिसरात काही काळ हालचालींना वेग आला होता. प्रशासनाने निवेदन स्विकारले असून, योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.









