रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोली मार्गावरील प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

---Advertisement---

 

जळगाव, दि.२४ (प्रतिनिधी) : जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या जकात नाक्यापर्यंत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मेहरुण तलावामुळे निसर्गरम्य ठरलेला हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणामुळे अधिक सुकर झाला असला, तरी सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे त्याचे सौंदर्य पूर्णतः नष्ट होत आहे. या मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, जैन हिल्ससारख्या महत्त्वाच्या संस्था तसेच अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. पाचोरा, चाळीसगाव तसेच नाशिक-पुण्याकडे जाण्यासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


दरम्यान, काही सामाजिक संघटनांनी या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे कचरा रस्त्यावर उडून येतो व वाहनचालकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे.


प्रशासनाचे दुर्लक्ष?
या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’च्या घोषणा करणारे प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. दंडात्मक कारवाईचा अभाव असल्यामुळे कचरा टाकण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.


आरोग्याचा गंभीर प्रश्न
साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.


एकूणच, शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---