---Advertisement---
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात उभारण्यात आलेल्या विश्वातील एकमेव मानल्या जाणाऱ्या ग्रह-राशी-नक्षत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
श्री बदरीनाथ मंदिर संस्थान देवस्थानच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत देवस्थानाचे गादीपती प.पू. स. गु. मयूरदादा महाराजश्री यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या मंदिराची उभारणी विशेष संकल्पनेतून करण्यात आली असून, ग्रह, राशी आणि नक्षत्र यांच्या आधारे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे हा या मंदिराचा मुख्य उद्देश आहे.
या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक २८ मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेस संस्थेचे पदाधिकारी सुधीर वाघुळदे (उपाध्यक्ष), हिमांशू भावसार (कोषाध्यक्ष) आणि भूषण विलास पाटील (सचिव) उपस्थित होते.
मन्यारखेडा परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर भाविकांसाठी एक नवीन आध्यात्मिक केंद्र ठरणार असून, या अनोख्या संकल्पनेमुळे जळगाव जिल्ह्याचे नावही देशभरात उज्ज्वल होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









