---Advertisement---
मुंबई : दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा मंदीचे सावट दिसून आले. सर्वच क्षेत्रांतील विक्रीचा दबाव, रुपयाचे सातत्याने होणारे अवमूल्यन आणि अमेरिका-इराण संघर्षाबाबतची अनिश्चितता यामुळे भारतीय शेअर बाजारात सुमारे दोन टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली.
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे शुक्रवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. निफ्टी २३,१७३ वर उघडला. मात्र, दिवसभराच्या सत्रात विक्रीचा दबाव वाढत गेला. परिणामी, निफ्टी २२,८०४ या दिवसाच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आणि अखेर त्याच पातळीच्या जवळ बंद झाला.
दिवसअखेर सेन्सेक्स १,६९० अंकांनी (२.२५ टक्के) घसरून ७३,५८३ वर स्थिरावला. तर, निफ्टी ४८६ अंकांनी (२.०९ टक्के) घसरून २२.८१९ वर बंद झाला. व्यापक बाजारातही घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप २.२ टक्क्यांनी तर, स्मॉलकॅप निर्देशांक १.७टक्क्यांनी घसरला. संपूर्ण आठवड्याचा विचार करता, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे १.२ टक्क्यांची घट झाली.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी ४३१.०१ लाख कोटी रुपये होते. ते शुक्रवारी ८.९७ लाख कोटी रुपयांनी घसरून ४२२.०४ लाख कोटी रुपयांवर आले. दुसरीकडे, भारतीय रुपयाने सलग दुसऱ्या सत्रात घसरण कायम ठेवत, प्रथमच प्रति डॉलर ९४ रुपयांचा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान रुपया ९४.८४ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला आणि अखेर ९४.८१ वर स्थिरावला. बुधवारी रुपया ९३.९८ वर बंद झाला होता.
क्षेत्रनिहाय पाहता, ऑटो, कन्झ्युमर ड्यूरेबल, कॅपिटल गुड्स आणि खाजगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्स सुमारे दोन टक्क्यांनी घसरले. निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, टाटा मोटर्स (पॅसेंजर व्हेईकल), इंडिगो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स हे सर्वाधिक घसरलेले शेअर्स ठरले. तर ओएनजीसी, टीसीएस, विप्रो, भारती एअरटेल आणि कोल इंडिया या काही मोजक्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली.
तांत्रिक विश्लेषणानुसार, गेल्या काही सत्रांतील सुधारनेनंतर निफ्टीमध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. दैनंदिन चार्टवर ‘लॉग बेअर कॅन्डल’ तयार झाली असून, ती बाजारातील तीव्र मंदीचे संकेत देत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला उतरता कल कायम असून येत्या आठवड्यात निफ्टी २२,४५० किंवा त्याहून खाली जाण्याची शक्यता आहे. २२,००० हा महत्त्वाचा आधार स्तर असून २३,२०० हा प्रतिकार स्तर राहील.
क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतार, अमेरिका आणि जपानमधील बाँड यील्डमध्ये झालेली वाढ, वाढता व्हिआयएक्स आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









