“पायी वारीची अखंड ओढ… ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ८ जुलैला प्रस्थान, २४ जुलैला विठुरायाच्या चरणी विसावणार…!”

---Advertisement---

 

पंढरपूर (अभिजीत अवताडे)
भक्ती, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल १७ दिवसांच्या या पायी प्रवासानंतर २४ जुलै रोजी पालखी पंढरपूरात दाखल होणार असून २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा होणार आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

यंदाच्या वारीत ४ गोल आणि ३ उभे रिंगण होणार असून वारकऱ्यांसाठी हा सोहळा भक्तिभावाने ओथंबलेला असणार आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मठात यासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीला संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार तसेच दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चैत्र दशमीपासून सुरू असलेल्या नियोजन परंपरेनुसार प्रस्थान, मुक्काम व इतर बाबींचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

पालखीचा मुक्काम वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ९ व १० जुलै पुणे, ११ व १२ जुलै सासवड, १३ जुलै जेजुरी, १४ जुलै वाल्हे, १५ जुलै नीरा स्नानानंतर लोणंद, १६ जुलै चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होऊन तरडगाव येथे मुक्काम असेल. १७ जुलै फलटण, १८ जुलै बरड, १९ जुलै नातेपुते, २० जुलै पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन माळशिरस, २१ जुलै खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर, २२ जुलै ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण व टप्पा येथे बंधू भेट होऊन भंडीशेगाव येथे मुक्काम असेल. २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण होऊन वाखरी येथे पालखी विसावणार असून २४ जुलै रोजी आषाढ दशमीला पंढरपूर येथे सर्व संतांच्या पालख्या दाखल होणार आहेत.

ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता शेकडो किलोमीटर पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुर असतात. यंदाही वारीची ओढ भाविकांमध्ये वाढली असून प्रशासनाकडे विविध सोयी-सुविधांबाबत मागण्या मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
वारी ही केवळ यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामूहिक श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. जो प्रत्येक वर्षी नव्या उत्साहाने आणि नव्या आशेने पंढरीकडे मार्गस्थ होतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---