पत्रकार प्रीमियर लीग पर्व 2 चा विजेता ठरला प्रेस फोटोग्राफर संघ….!

---Advertisement---

 

जळगाव येथे पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली राज्यातील एकमेव क्रिकेट स्पर्धा ‘पत्रकार प्रीमियर लीग’ पर्व-२ दिमाखात पार पडली. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप २९ मार्च रोजी उत्साहात झाला असून प्रेस फोटोग्राफर संघ याने विजेतेपद पटकावत स्पर्धेवर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघ यांना पराभूत करत त्यांनी ही कामगिरी साध्य केली. तर प्रेस एडिटर संघ यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

पत्रकारांच्या आरोग्य आणि मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर पार पडली. समाजाचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पत्रकार संघ, जळगाव शहरातील पत्रकार, संपादक, तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे संघ सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. ६ षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोच्च ९९ धावसंख्या तर किमान २० धावसंख्या अशी रंगतदार आकडेवारीही पाहायला मिळाली.

या स्पर्धेत जवळपास ५०० हून अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला होता. खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जेवण, पिण्याचे पाणी, सरबत तसेच सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण यामुळे स्पर्धेला आणखी रंगत आली.

स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

उपांत्य फेरीत गतविजेता चाळीसगाव संघासह जळगाव प्रिंट मीडिया, जळगाव एडिटर आणि प्रेस फोटोग्राफर संघ यांनी प्रवेश केला होता. अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला आणि अखेरीस प्रेस फोटोग्राफर संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

---Advertisement---

 


शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांनी स्पर्धेची रंगत आणखी वाढवली. विविध शासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मैदानात उतरून क्रिकेटचा आनंद घेतला. एकूणच, पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ ने केवळ क्रीडा स्पर्धा नव्हे, तर एकात्मता आणि उत्साहाचा अनोखा सोहळा म्हणून सर्वांची मने जिंकली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---