थॅलेसेमिया व सिकलसेल या अनुवंशिक आजाराला हद़दपार करण्यासाठी नंदुरबारच्या जनकल्याण सेवा संस्थेने उचललेले पाऊल कौतुकास्पद- डॉ मंजु कुलकर्णी 

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्ह्यात थॅलेसेमिया आणि सिकलसेल या अनुवंशिक आजारांविरुद्ध व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी जनकल्याण सेवा संस्थेने सुरू केलेले प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करत, या अभियानाला लोकचळवळीचे रूप देण्याचे आवाहन डॉ. मंजू कुळकर्णी यांनी केले. या लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाने तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. ही कार्यशाळा जनकल्याण सेवा संस्था आणि मनुदेवी फाऊंडेशन संचलित नंदुरबार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन के. डी. गावित संकुलचे प्रमुख राजेंद्रकुमार गावित आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील, पालक प्रतिनिधी योगेश पारेख, तसेच रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राजेश ठाकूर आणि डॉ. अर्जुन लालचंदानी उपस्थित होते.

थॅलेसेमिया या गंभीर आजाराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी संस्थेने ‘नंदुरबार जिल्हा थॅलेसेमिया मुक्त अभियान’ सुरू केले आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, प्राध्यापक, तसेच स्काऊट आणि एनएसएसचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी झाले होते. जिल्हाभरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

थॅलेसेमिया रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी लवकरच विशेष मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सीबीसी तपासणी व रक्त तपासणी शिबिरे घेण्याचे नियोजन आहे. जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यकारिणी स्थापन करून प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक रचना उभारली जाणार आहे. उन्हाळ्याच्या काळात रक्तदान शिबिरांवर विशेष भर देत रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कार्यक्रमात राजेंद्रकुमार गावित यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात आले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी रोटरी क्लबच्या सहकार्याने संयुक्त शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राजेश केसवानी यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कासार, आनंद रघुवंशी, विभूती गावित यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी थॅलेसेमिया रुग्णांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. नवनिर्माण समाजहित संस्था, वसुंधरा, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, रोटरी क्लब ऑफ नंदुरबार, फेमिना क्लब आणि रेड क्रॉस या संस्थांनीही सहभाग नोंदवला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---