---Advertisement---
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आज, मंगळवार 31 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत काही त्रुटी राहिलेल्या महिलांसाठी त्या दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी ठरणार आहे. ठरलेल्या वेळेत ई-केवायसी न केल्यास संबंधित महिलांचा योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे. सुरुवातीला या योजनेत सुमारे 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी होत्या, मात्र आता या संख्येत तब्बल 71 लाखांची घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ती जाहीर केली होती. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याचा राजकीय परिणामही दिसून आला.
दरम्यान, योजना सुरू झाल्यानंतर काही अपात्र आणि बोगस लाभार्थी योजनेत सहभागी झाल्याचे लक्षात आले. वार्षिक उत्पन्नाची अट असतानाही काही सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. यानंतर सरकारने अशा लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आणि नंतर ई-केवायसीद्वारे इतर अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली.
या प्रक्रियेत अनेक महिलांची नावे योजनेतून वगळली गेली. तसेच, ठरलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले. यामुळे काही महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर सरकारने मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत संधी दिली होती, जी आज संपत आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, सध्या 1 कोटी 76 लाख 5876 महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जानेवारी महिन्यात ही संख्या सुमारे 1 कोटी 69 लाख होती. एकूण लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 47 लाखांवरून कमी होऊन सुमारे 71 लाखांनी घटल्यामुळे राज्याच्या आर्थिक भारातही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.









