Ashok Kharat Case: तपासाची व्याप्ती वाढली; डॉक्टरांच्या भूमिकेवरही संशयाची सुई

---Advertisement---

 

नाशिक : भोंदूगिरी आणि गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथक (SIT) तपास करत असताना आता काही डॉक्टरांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातच्या संपर्कात काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असल्याचे संकेत मिळाले असून त्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


गेल्या काही तासांपासून SIT कडून खरातची सखोल चौकशी सुरू असून, त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. विशेष म्हणजे, खरातवर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत; मात्र एकही महिला गर्भवती न झाल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. खरात कोणत्यातरी गर्भनिरोधक औषधांचा वापर करत होता का, याबाबतही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते.


तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे, खरात वेगवेगळ्या कामांसाठी तीन ते चार मोबाईल क्रमांक वापरत होता. सामान्य लोक, व्हीआयपी संपर्क, आर्थिक व्यवहार आणि महिलांसाठी वेगळे नंबर वापरून तो आपले जाळे विस्तारत होता. पोलिसांनी त्याचे मोबाईल जप्त केले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


दरम्यान, खरातची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत होती आणि बुधवारी ती संपत आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील सुनावणीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली SIT पथकाने तपास अंतिम टप्प्यात आणला असून, या प्रकरणात आणखी कोण-कोण अडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---