ठाकरे गटाला धक्का! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदे गटात; नव्या जबाबदारीने राजकारणात खळबळ

---Advertisement---

 

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती; जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राजकारणात काहीही अशक्य नसते, याची पुन्हा एकदा प्रचिती जळगावात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी अखेर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.


या नव्या नियुक्तीमुळे शिंदे गटात उन्मेश पाटील यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उन्मेश पाटील नाराज होते. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी आपल्या निकटवर्तीय करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र, या निवडणुकीत करण पवार यांचा पराभव झाला.


या पराभवानंतर ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद आणि विरोधात बसून कामे न होण्याचा अनुभव यामुळे पाटील नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत सत्ताधारी पक्षात राहून मतदारसंघातील कामांना गती देण्याचा निर्णय घेतला.


विशेष म्हणजे, अलीकडील काळात उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या कार्यक्रमांपासून दूर असल्याचे दिसत होते. त्यांनी पक्षाशी काहीसे अंतर राखल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


यासोबतच, पाटील यांच्या सहकाऱ्यांनाही विविध पदांवर संधी दिली जात असल्याने शिंदे गटाकडून त्यांचा सन्मान केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव आणि धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---