साकळी येथे वादळात उंबराचे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला…!

---Advertisement---

 

यावल तालुक्यातील साकळी येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली. दि. २ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास चावडी परिसरातील दत्त मंदिराजवळील एक भले मोठे उंबराचे झाड अचानक मुळासकट उन्मळून पडले. या घटनेत मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा थोडक्यात बचाव झाला असून, मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रोहिणी योगेश नेवे (वय ४५) या सायंकाळी दत्त मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्या एकट्याच मंदिर परिसरात उपस्थित होत्या. दर्शन घेत असताना अचानक मंदिराच्या बाजूचे उंबराचे मोठे झाड जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. हे झाड त्यांच्या अगदी काही अंतरावर पडल्याने त्या क्षणभर हादरल्या, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
झाड कोसळल्यामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शी महिलांनी तात्काळ आरडाओरड करत रोहिणी नेवे यांना सावध केले. परिस्थितीचे भान राखत त्यांनी धाडस दाखवत बाजूच्या स्टीलच्या ग्रीलवर चढून स्वतःचा जीव वाचवला. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे त्या सुखरूप बाहेर पडल्या.

विशेष म्हणजे, झाड मंदिराच्या बाजूला लावलेल्या स्टीलच्या ग्रीलवर पडल्यामुळे मंदिराचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तसेच त्या वेळी मंदिरात मोठी गर्दी नसल्यामुळे मोठा अपघात टळला. दररोज सायंकाळी या मंदिरात पूजा आणि आरतीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित असतात. जर ही घटना गर्दीच्या वेळी घडली असती, तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. वादळी वाऱ्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---