---Advertisement---
फैजपूर : साता समुद्रापार अमेरिकेतील पॅलेटाईन (शिकागो) येथील श्री स्वामिनारायण मंदिर वडतालधाम येथे चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री हनुमानजींचा प्रागट्य उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या उत्सवात विविध राज्यांतील भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. गुजराती, मराठी, तामिळ, कर्नाटक तसेच उत्तर भारतीय भक्तांनी दर्शन घेऊन हनुमानजींना तेल व नारळ अर्पण करत आपली भक्ती व्यक्त केली.
सायंकाळी भव्य समूह हनुमान प्रागट्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत समूह हनुमान पूजा पार पडली. या पूजेमध्ये ५० हून अधिक भक्तांनी एकत्र सहभागी होत आध्यात्मिक लाभ घेतला. तसेच वडतालधाम परिवारातील भक्तांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
या उत्सवाच्या आयोजनात पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी, शास्त्री मुक्तप्रकाशदासजी तसेच संपूर्ण सत्संग समाजाचे मोलाचे योगदान लाभले. यजमानांच्या माहितीनुसार, या निमित्ताने येत्या शनिवार व रविवारी पूज्य शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांच्या श्रीमुखातून बजरंग बाणाची कथा तसेच संगीतबद्ध सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









