---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर शहरातील भांडारकर कंपाऊंड, स्टेशन परिसरात गटरमध्ये अडकलेल्या एका श्वानाचा अग्निशमन दलाने यशस्वी बचाव करून त्याचे प्राण वाचविले. या घटनेमुळे माणुसकीचा सुंदर प्रत्यय देणारा प्रसंग शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढल्याचे संदीप जैन यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहणी केली असता एक श्वान खोल गटरमध्ये अडकलेला असल्याचे दिसून आले. संदीप जैन यांनी स्वतः त्या श्वानाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ नगरपरिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख आणि आकाश संदानशिव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कार्यवाही करत श्वानाला सुरक्षित बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले.
वादळी पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीतही एका मुक्या प्राण्याच्या मदतीसाठी पुढे येत केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशासन आणि नागरिकांनी दाखविलेली ही संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून माणुसकीचा संदेश देणारी आहे.









