---Advertisement---
केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरनमुला मतदारसंघात भाजप-एनडीएकडून उमेदवारी जाहीर झालेल्या कुम्मनम राजशेखरन यांच्या प्रचाराची धुरा पक्षाने आ. अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे सोपवली आहे. ही जबाबदारी त्यांच्या तसेच रावेर मतदारसंघासाठी मानाची मानली जात असली, तरी ती तितकीच आव्हानात्मकही आहे.
राजशेखरन यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणून काम पाहिले असून ते भाजपचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. केरळमधील पक्ष संघटन उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिल्यामुळे त्यांना ‘भाजपचे पितामह’ अशीही ओळख आहे. हिंदू संघटनांशी असलेला त्यांचा दीर्घकाळाचा संबंध, व्यापक संघटन कौशल्य आणि साधी जीवनशैली यामुळे त्यांच्या समर्थकांचा ठाम पाठिंबा आजही कायम आहे.
निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदारसंघातील विविध भागांत बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये प्रचाराची रूपरेषा, नियोजनाची अंमलबजावणी, बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे मार्ग यावर सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध प्रचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी स्पष्ट करताना मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आला.









