---Advertisement---
भूसावळ शहरातील फातेमा कॉलनी भागात झालेली ५ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि रोख रकमेची घरफोडी उघडकीस आणण्यात भूसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. डी.बी. पथकाने अवघ्या दोन दिवसांत एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा. फातेमा कॉलनी, भूसावळ) हे २८ मार्च ते ३० मार्च दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा (रजि. नं. १५९/२०२६) दाखल करण्यात आला होता.
तपास आणि कारवाई:
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमीर खान हबीब खान (वय ३५, रा. न्यू ईदगाह जवळ, भूसावळ) याला ताब्यात घेतले.
तपासणी दरम्यान, आरोपीने एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.









