जळगावच्या एकलव्यनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यावरून तणाव; आदिवासी समाज आक्रमक, महापालिका पथक फिरले माघारी….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात एकलव्य नगरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव महापालिकेच्या पथकाला स्थानिक आदिवासी भिल्ल समाजाच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला, ज्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

जळगाव महापालिका हद्दीतील एकलव्य नगर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकाळी कारवाई सुरू केली. या कारवाईसाठी दोन जेसीबी, ट्रॅक्टर आणि मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. प्रशासनाकडून झोपडपट्टी हटवण्याची तयारी सुरू असतानाच परिसरातील आदिवासी भिल्ल समाजातील रहिवाशांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शवला.
अचानक मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे परिस्थिती चिघळली. रहिवासी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली आणि काही काळ गोंधळ उडाला. परिसरात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांनी स्पष्टपणे सांगितले की, ते गेल्या वीस वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना हटवण्यापूर्वी शासनाने ही जागा त्यांच्या नावावर करावी किंवा पर्यायी पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.


आदिवासी बांधवांचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनालाही काही काळ माघार घ्यावी लागली. अतिक्रमण हटवण्याची मुख्य कारवाई थांबवण्यात आली. मात्र, परिसरातील झाडे आणि झुडपे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण पथक घटनास्थळावरून परतले.

या संपूर्ण प्रकारानंतर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणावर घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. स्थानिक रहिवासी, संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी अतिक्रमण हटवण्याची कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

या घटनेमुळे एकलव्य नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पुनर्वसनाचा प्रश्न आणि अतिक्रमणाचा मुद्दा कायम असल्याने पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---