---Advertisement---
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असून जागतिक पातळीवरील युद्धजन्य तणाव हे प्रमुख कारण ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर झाल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत, मात्र त्याच वेळी बाजारातील अनिश्चिततेमुळे दरात सतत बदल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारी दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र बाजारात घसरण नोंदवली गेली आहे. आज सोन्याच्या भावात तब्बल १ हजार रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या भावात २ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर १ लाख ४८ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत, तर चांदीचे दर २ लाख ३५ हजार रुपयांवर स्थिरावले आहेत. जीएसटीसह विचार केला असता सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ४४० रुपयांपर्यंत जात आहे, तर चांदीचा दर २ लाख ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचत आहे. या दरातील चढ-उतारामुळे सराफा बाजारात खरेदी-विक्रीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सोने तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असून पुढील काही दिवसांतही दरात अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.









