---Advertisement---
जळगाव शहरात नातेवाईक पाहुणी म्हणून घरात आलेल्या एका महिलेकडून दागिने चोरी केल्याची धक्कदायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाहुणी म्हणून विश्वासाने घरात ठेवलेल्या महिलेनं संधी साधत सुमारे ९७ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथून दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या संशयित अश्विनी वाघ (वय ३९) या महिलेनं घरमालक महिला बाहेर गेल्याची संधी साधली. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिनं सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती घरमालक महिलेला परत आल्यानंतर समोर आली.
जळगाव येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी दीपिका पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला ही नातेवाईक असल्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवण्यात आला होता. मात्र, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिनं चोरी केल्याचा आरोप आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची पोत, अंगठ्या आणि चांदीचे दागिने यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधित महिलेला लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, ओळखीच्या व्यक्तींवरही पूर्णपणे विश्वास ठेवताना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.









