---Advertisement---
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी होण्याऐवजी वाढतच चाललं आहे. अशातच पुन्हा एकदा चारित्र्यावर संशय घेत हत्येची एक धक्कादायक घटना घडली असून खळबळ उडाली आहे.
बायकोने नवऱ्याच्या चरित्रावर संशय घेत तसंच नवऱ्याला तृतीय पंथीयांचा नाद असल्याने पत्नी विरोध करत असल्याच्या कारणाने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा सांगलीतल्या विटा येथे घडला आहे. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके वय 23 असं या मृत महिलेचे नाव असून संशयित अविनाश तुकाराम लोटके असं पतीचं नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती हा फरार झाला आहे. या प्रकरणी मृत महिलेची मावशी दिपाली साठे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान परिसरात घडलेल्या हत्येच्या दुसऱ्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अविनाश लोटके याचा विवाह काजल लोटके हिच्याशी गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी झालेला होता. या दोघांचा हा आंतरजातीय प्रेमविवाह होता. काजल ची आई ही मुंबईला राहत असल्याकारणाने काजल ही तिची मावशी दिपाली साठे हिच्याकडे लहानपणापासून राहत होती. प्रेमविवाह केल्यानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर दोघेही विटा येथील सुतारकी मळा येथे भाड्याच्या घरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी उशिरा रात्री अविनाश आणि काजल हे दांपत्य अष्टमीच्या यात्रेसाठी गेलेले होते आणि तिथून वापस आल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर माझी पत्नी मला काहीही न सांगता कुठेतरी बाहेर निघून गेली असं सांगून अविनाशने त्याचा मित्र रोहित कोरडे यांच्याकडे त्याच्या तीन वर्षांचा मुलाला सोपवलं आणि तिथून निघून गेला. बराच वेळ निघून गेल्यानंतर अविनाश हा परत आला नाही म्हणून त्याचा मित्र रोहित ने त्याच्या घराकडे धाव घेतली.
मित्र रोहित कोरडे हा अविनाशच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने घराच्या खिडकीतून पाहिलं त्यावेळी त्याला घरात मोठ्या प्रमाणावर फरशीवर पडलेले रक्त दिसलं. रोहित ने आरडाओरड केली आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दाराला आतून कडी असल्याचा समोर आलं. त्यावर रोहितने अविनाशच्या घरमालकाकडे संपर्क केला आणि त्यांना बोलवून घेतलं. त्यानंतर पोलिसांनाही संपर्क करण्यात आला. पोलीस आल्यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली काजल दिसली. काजलच्या डोक्यात गंभीर असे वार करण्यात आलेले दिसले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. यानंतर काजलची मावशी दिपाली साठे हिने विटा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील हे करत आहेत.









