मानापमान : पंढरीतील जिजामाता उद्यान लोकापर्णावरून राजकीय कलगीतुरा

---Advertisement---

 

पंढरपूर : ( प्रतिनिधी ) शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या लोकापर्ण सोहळ्याने एकीकडे विकासाचा आनंद दिला, तर दुसरीकडे राजकीय मानापमान आणि आरोप-प्रत्यारोपांची ठिणगीही पडली. उद्घाटनाच्या या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व भाजपाच्या महिला नगरसेविकांच्या हस्ते फीत कापत उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. हे उद्यान पंढरपूरकरांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आले. आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.

या उद्यानाचे लोकार्पण कार्यक्रम सोहळा प्रसंगी माजी आमदार प्रशांतराव परिचारक ,आमदार समाधान दादा अवताडे, विविध पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

“उद्यान जनतेसाठी खुले, विकासाचा टप्पा” — प्रशांतराव परिचारक

माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शहराचा कायापालट करणे आणि प्रलंबित कामे मार्गी लावणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. “अनेक वर्षे बंद असलेले हे उद्यान आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी फिरण्याची सोय आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“उद्घाटन झाले म्हणजे काम पूर्ण झाले असे नाही” — समाधान अवताडे

आमदार समाधान दादा अवताडे यांनी सांगितले की, “उद्घाटन झाले म्हणजे सर्व कामे पूर्ण झाली असे नाही. काही सुविधा उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील.”

“सुविधा अपुऱ्या, तरी उद्घाटनाची घाई का?” — प्रणिता भालके

दरम्यान, नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेत, “जिजामाता उद्यानाच्या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. मग अशा स्थितीत उद्घाटनाची घाई का करण्यात आली?” असा सवाल उपस्थित केला.

तसेच, या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता नसल्याचा आरोप करत, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

तिर्थक्षेत्र विकास आघाडीची पाहणी; कामाचा ‘पोलखोल’

दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामाच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली आणि अनेक त्रुटी समोर आल्याचा दावा करण्यात आला. या पाहणीदरम्यान आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ , नगरसेवक संजय बनपट्टे, विनायक देवमारे, ओंकार जोशी आदी उपस्थित होते. त्यांनी कामाचा ‘पोलखोल’ करत अपूर्ण व निकृष्ट कामांवर नाराजी व्यक्त केली.

शिवाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नगर अभियंता केसकर यांना घेराव घालून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी जाब विचारला. याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे नेते दिलीप धोत्रे यांनी देखील उद्यानाच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त करत याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगितले व घोटाळा झाला असल्याचे नमूद केले.

नगरसेवक व नागरिकांची मिश्र प्रतिक्रिया

या प्रकरणावर नगरसेवकांमध्ये मतभेद दिसून आले. काहींनी उद्यान खुले करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांमध्येही आनंदासोबतच संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

एकीकडे अनेक वर्षांपासून बंद असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले झाले, ही सकारात्मक बाब असली तरी उद्घाटनाच्या घाईगडबडीमुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण झालेला वाद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आता उर्वरित कामे दर्जेदार व लवकर पूर्ण करून नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच सर्व संबंधितांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---