पहलगाम विसरलेलो नाही; मर्यादा ओलांडल्यास प्रत्युत्तर, भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

---Advertisement---

 

श्रीनगर : भारतीयांचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची बुधवारी २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती आहे. या पृष्ठभूमीवर सुरक्षा यंत्रणां सतर्क असून, काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधून भारत विसरलेला नाही, मर्यादा ओलांडल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे.

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे एक छायाचित्र प्रसिद्ध करीत भारतीय लष्कराने पोस्टमध्ये म्हटले की, भारत काहीही विसरत नाही. जेव्हा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तर हे निर्णायक असते. भारत कधीही हल्ले विसरत नाही. ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला, त्यांना न्याय देण्यात आला आहे. भारत एकसंध आहे आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. कुठलीही चूक झाल्यास शत्रूला तितक्यात ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.

पाकिस्तानातून आलेल्या काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. ऑपरेशन सिंदूरमधून आणि काश्मिरात राबविण्यात आलेल्या मोहिमेतून हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्यात आली.

सुरक्षेत बदल, विशेष दलांची स्थापना

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षेत मोठे बदल करीत डोंगराळ भागात दोन विशेष दलांची स्थापना केली आहे. बर्फाळ प्रदेशात अतिउंच ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ‘स्नो लिओपार्ड’ व ‘मार्खार’ या दोन प्राण्यांची नावे विशेष दलांना देण्यात आली आहे. ‘स्नो लिओपार्ड’ दलाला अति उंचीवर ऑपरेशन्स करण्याचे, तर ‘मार्खार’ दलाला घनदाट जंगलात ऑपरेशन्सचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतीय लष्कराने देखील स्वतःच्या क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे.

२२ एप्रिलला काय घडले ?

२२ एप्रिल २०२५ ला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत मृत्यूचे तांडव केले. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ६-७ मे रोजी पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---